महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, साने गुरुजी, पांडुरंग वामन काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रे. ना. वा. टिळक, रँगलर परांजपे, श्री. ना. पेंडसे अशा नररत्नांची खाण असणारा दापोली तालुक्यातील निसर्ग , इथली माती, नारळी पोफळीच्या सुपारीच्या बागा, आंबे-फणस-काजूची झाडे, मासे, सुंदर समुद्र किनारे, हिरवेगार डोंगर, वळणावळणाच्या नद्या, निसर्गाची नवलाई हे सारे अनुभवायचे असेल तर दापोलीला जायलाच हवं. इथे सुमारे ६० पर्यटनस्थळे व ११ समुद्र किनारे आहेत.
जालगाव येथील श्रीइच्छापूर्ती गणेशाचे मंदिर हे देखील गणेशभक्तांना आकर्षित करत असते. गावातील ब्राह्मणवाडीत महालक्ष्मी मार्गावर असणाऱ्या या गणपतीची आराधने केल्यास इच्छापूर्ती होते, असे म्हटले जाते. हि मूर्ती द्विभुज आहे. गणपतीचे पोट नेहमीच्या मूर्तीच्यापेक्षा आकाराने वेगळे व प्रमाणापेक्षा मोठे आहे. डोळे हे गारेचे आहेत. सोंड अगदी गुडघ्यापर्यंत लांब आहे. हि मूर्ती पेशवेकालीन आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड आणि हर्णे हे समुद्र किनारे अतिशय प्रसिद्ध आहेत. मुरुड गावात शिरल्याबरोबर कोपऱ्यात महर्षी कर्वे यांचा अर्धपुतळा दिसतो. इथला समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. इथल्या दुर्गादेवी मंदिरात नक्की जा. शिवाय सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग, हर्णेची बंदरपट्टी, नारळी पोफळीच्या सावलीत विसावलेली टुमदार घरे यांचे दर्शन घ्यायलाच हवे. गावात अनेक रिसॉर्ट असून अनेक ठिकाणी घरगुती राहण्याची, जेवण्याची सोय आहे.
कर्दे हा समुद्र किनार मुरुडजवळच आहे. इथे स्थलांतरीत पक्षी येतात. गेल पक्ष्यांचे दर्शन घडते. समुद्रात डॉल्फिन दिसतात. भल्या पहाटे बोटीने समुद्रात जाण्याचा अनुभव अतिशय वेगळा असतो.
दापोली तालुक्यातील पालगड किल्ल्यावरून नाव पडलेले पालगड हे गाव प्राचीन श्रीदेव गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ब्राम्हण वाडीत हे मंदिर आहे. पालगड किल्याचा आकार पालीसारखा असल्यामुळे या किल्ल्याला पूर्वी ' पालील ' असे नाव होते. नंतर गावाचे पालिगड हे नाव बदलून पालगड झाले. दापोलीपासून हे गाव २१ किलोमीटर अंतरावर आहे.मंडणगडपासून २० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. पूज्य सानेगुरुजींची जन्मभूमी म्हणूनही हे गाव प्रसिद्ध आहे. शिवछत्रपतींनी या गावाला भेट दिल्याचे सांगितले जाते. मंदिरात १८९६ पासून श्रीगणेशोत्सव साजरा होतो. मंदिरातील मूर्ती ३०० वर्षांपूर्वीची आहे. जोशी कुलवृत्तांतात विठ्ठलभट वंशावळीत तशी नोंद असून सध्या त्यांची तेरावी पिढी ते कागदपत्र जपताहेत. विठ्ठलभटांना गणपतीने स्वप्नदृष्टांत देऊन एका पिंपळवृक्षाखाली जमिनीत असणाऱ्या आपल्या वास्तव्याची माहिती दिली होती. सव्वा दोन फूटांच्या व चतुर्भुज असणाऱ्या या मूर्तीच्या हातांमध्ये परशू , मोडलेला हात, मोदक व शस्त्र आहेत. गर्भगृहाचा आकार ८ चौरस फूटांचा आहे. मागे पिवळी प्रभावळ आहे. मंदिराशेजारी रंगमंच, श्रीविठ्ठल-रखमाई मंदिर, श्रीशंकर मंदिर, श्रीदेव मारुती, श्रीदत्त मंदिर व काही समाध्या आहेत.
दापोली तालुक्यातील कोळथरे हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. इथे समुद्र किनारा आहे. नारळीची दाट झाडी आहे. उतरत्या छपराची कोकणी तोंडवळ्याची घरे आहेत. बाजुच्या डोंगरात जिवंत झरे आहेत. इथले पाणी औषधासाठी वापरले जाते. समुद्र काठावरील डोंगरावर सागराचे पाणी वर्षानुवर्षे आदळून तिथे मोठ्यामोठ्या आकाराचे विवर तयार झाले आहे. या विवरावर लाटांचे पाणी आदळून येणारा आवाज अवघ्या डोंगरात घुमतो. हे मंदिरांचे गाव आहे. कोळेश्वराचे मंदिर हे ग्रामदेवतेप्रमाणे आहे. शिवाय श्रीसिद्धीविनायक, श्रीलक्ष्मी, विष्णु , मारुती आणि राम, खेम, दुर्गादेवी अश्या मंदिरांमुळे गाव मंदिरांचे गाव झाले आहे. कोळथरे गावाला जाण्यासाठी खेड, दापोली, चिपळूण, रत्नागिरी, दाभोळ इथून सोय आहे. शिवाय हॉटेल्स आहेत. रेल्वे, एसटी, लक्झरी गाड्या किंवा खासगी वाहनाने इथे येता येते. कोळथरे मधील वरचा भडारवाडा विभा हा श्रीसिद्धिविनायक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे १०० वर्षांपूर्वी एका शेतात नांगरणी सुरु असताना शेतकऱ्यांना जमिनीत हि मूर्ती सापडली. मूर्ती जड होती. ती उचलून बाजूला ठेवण्यात आली. पण ती जागची हलेना. त्याच शेतीच्या ठिकाणी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे शेत अरुण भिकाजी डुंबरे यांच्या मालकीचे आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिराचा जीर्णोद्धार मे, २००५ मध्ये झाला. हि चार भुजांची मूर्ती एकसंध पाषाणातील असून ती ६ इंच उंचीच्या चौथऱ्यावर बसलेली आहे. मंदिराला अष्टकोनी घुमट आहे. कोळथरे गावात दैवज्ञ ब्राम्हण समाजाचे श्रीगणेश मंदिर आहे. श्रीकोळेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या व गावाच्या मुख्य रस्त्यापासून जवळच थोड्याश्या उंचीवरील हे पुरातन व लाकडी कामाचे कौलारू असे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य सभागृहाला लोखंडी पत्र लावले आहेत. या मंदिराच्या समोरून ओढा वाहतो. हे मंदिर २०० वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. आधीची मूर्ती पूर्वी काळ्या पाषाणाची होती. ती मूर्ती जीर्ण झाली. नंतर समाजाच्या लोकांनी त्या मूर्तीचे विसर्जन केले व नवीन संगमरवरी मूर्तीची १९७३ मध्ये स्थापना केली. ती मूर्तीही नंतर विसर्जन केली व नंतर राजस्थानहून आणलेल्या नव्या मूर्तीची काही वर्षांपूर्वी प्राणप्रतिष्ठा केली. हि मूर्ती चार चौरस फूटांच्या चौथऱ्यावर विराजमान आहे. चतुर्भूज असणाऱ्या या मूर्तीच्या हातात शंख, आशीर्वाद देता हात, अंकुश व मोदक आहेत. दोन्ही पायांचे तळवे एकत्र आणून बसलेले आहेत. पिवळ्या तैलरंगाने पितांबर रंगवलेला आहे. या गावात लहानमोठे असे रिसॉर्ट आहेत. तिथे राहण्याची-जेवण्याची व्यवस्था होते. कोळथरे गावात श्रीदेव कोळेश्वर मंदिरातील श्रीसिद्धिविनायक प्रसिद्ध आहे. मंदिर छोटेसे असले तरी गाभारा ६ चौरस फुटांचा आहे. मूर्ती जमिनीपासून एक फूट उंचीवर आहे. मांडी घातलेली चार हातांची एक फुटाची ही मूर्ती संगमरवरी पाषाणाची आहे. हातात अंकुश, मोदक, परशू, माळ आहे. सोंड उजवीकडे आहे. पिवळा पितांबर आहे. मंदिराला गोल घुमट आहे. चार कोनांवर चार वाघ कोरलेले आहेत. उजवीकडे श्रीविठ्ठलरखुमाई मंदिर आहे. समोर ओढा आहे.
कोकणवासियांचे अराध्य दैवत श्रीमहालक्ष्मी देवीचे मंदिर दापोली तालुक्यातील केळशी या गावात आहे. केळशी गावाच्या एका टोकाला असणारे हे सुप्रसिद्ध श्रीमहालक्ष्मीचे व दोन घुमटांचे मंदिर पेशवेकालीन आहे.हे मंदिर शके १८०८ मध्ये बांधले आहे. या उत्तराभिमुख मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूला श्रीगणेशाचे स्वतंत्र मंदिर आहे. मंदिर फारच छोटे आहे. त्या मंदिरातील श्रीगणेशाची मूर्ती दोन फूट उंच आहे. काळ्या पाषाणाची चतुर्भुज मूर्तीचा एक उजवा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे. तर दुसऱ्या हातात शस्त्र आहे. डाव्या हातांपैकी एका हातात मोदक आहे तर दुसऱ्या हातात शस्त्र आहे. श्रीगणेशाचा उजवा पाय उभा दुमडून त्यावर हात ठेवलेला आहे. डावा पाय आडवा दुमडून घेतलेला आहे. शेजारी शिवाचे लिंग आहे. प्रथम श्रीगणेशाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या नजरेस पडतात ती श्रीमहालक्ष्मी मंदिराच्या वर असलेले दोन घुमट. मंदिरात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला स्वयंभू श्रीमहालक्ष्मी देवीचा गाभारा आहे. त्यात श्रीदेवीचे स्थान आहे. दुसऱ्या घुमटाखाली सभागृह आहे. हे मंदिर शके १८०८ मध्ये बांधले असावे. हे मंदिर पेशवेकालीन वास्तुशिल्पाचा नमुना आहे. मंदिराला चारही बाजूनी चिऱ्याची उंच तटबंदी आहे. मंदिराचा इतर परिसर प्रशस्त आहे. त्या परिसरात एक विहीर आहे. केळशी गावात राहण्यासाठी चांगली हॉटेल्स नाहीत. मात्र खाण्यापिण्यासाठी छोटी उपहारगृहे आहेत. केळशीचे खास आकर्षण म्हणजे सुमारे अडीच कि.मी. लांबीचा पांढरीशुभ्र वाळू असलेला समुद्रकिनारा व वाळूची टेकडी. या टेकडीवर धावणे-घसरणे म्हणजे लहान मुलांचा एक पर्वणीच. केळशी हे गाव दापोलीपासून ४० कि.मी. अंतरावर आहे. तिथे जाण्यासाठी एस.टी. बसेस ची सोय उपलब्ध आहे. तसेच रिक्षासुद्धा मिळतात.
दापोलीपासून हर्णेच्या वाटेवर सुमारे ८ कि.मी. अंतरावर भगवान विष्णुचे वेगळे रूप असणारे केशवराजाचे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी आसुदबाग थांब्यावर उतरावे लागते. सभोवताली पोफळी-नारळाची, आंब्या-फणसाची दाट झाडी पाहून मन मोहून जाते. हि झाडी इतकी दाट आहे कि त्यातून सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पडत नाही. याच झाडांच्या सावलीतून केशवराज मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. वाटेत साकव नदीवरचा पूल ओलांडून दुसऱ्या डोंगरापाशी जावे लागते. मंदिराकडे जाण्यासाठी सव्वा दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात. केशवराज मंदिर गर्द झाडीत लपलेल ऐसपैस दगडी देऊळ आहे. मंदिराच्या आवारात गोमुख आहे. या गोमुखातून १२ महिने थंडगार व स्वच्छ पाणी वाहत असते. केशवराजाच्या मुख्य दगडी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती पाहावयास मिळते. डाव्या बाजूला मारुती व उजव्या बाजूला गरुड आहे. केशवराजाच्या हातात शंख, चक्र, गदा,पशू अशी चार आयुधे आहेत. कार्तिकातल्या पहिल्या एकादशीपासून ५ दिवस येथे उत्सव असतो. पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसाद असतो. तर दुसऱ्या एकादशीपासून तीन दिवस उत्सव असतो. त्रयोदशीला महाप्रसाद असतो. डोंगरातून वाहत येणाऱ्या पाण्याचे पाट, ओल्या सुपार्यांचे वाळवण, लाल मातीची छान पायवाट, आसुद गावातील कोकणी घरगुती जेवणाचा आस्वाद, समईच्या ऊजेडातील विष्णूची प्रसन्न मूर्ती यांची अनुभव घेतलाच पाहिजे. मंदिराच्या शेजारी एक सभामंडप आहे. त्यामध्ये २० ते २५ जणांची मुक्कामाची व्यवस्था होऊ शकते. देवळाच्या मागील डोंगरावर दाट झाडी असल्याकारणाने इथे जंगलात खूप पक्षी आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षणाच्या आनंदही घेता येतो. इथे येण्यासाठी दापोली - हर्णे - आंजर्ले - मुरुडकडे जाणाऱ्या बसने आसूदबावगळा उतरावे. दापोलीपासून रिक्षासेवाही उपलब्ध आहेत.
वशिष्ठि नदीच्या खाडीकिनारी दापोली तालुक्यात दाभोळ हे गाव वसलेले आहे. चंडिकादेवी ही मूळ गावात उंच डोंगरावर पांडवकालीन गुहेत वसलेली आहे. हे मंदिर पांडवकालीन असून शिवाजी महाराजांनी या मंदिरासाठी सरंक्षण दिले होते. या देवीच्या मंदिरात विधुतप्रकाश चालत नाही. देवी उंच व मुख्य डोंगराच्या एक उतरत्या भुयारात वसलेली आहे. या मंदिरात उतरताना काळोखात नतमस्तक होऊन उतरावे लागते. गाभाऱ्यात छोटे तेलाचे दिवे पेटत असतात. त्या प्रकाशातच दगडावर कोरलेल्या स्वयंभू चंडिकादेवीचे दर्शन घेता येते. या मंदिराच्या पश्चिमेला पसरलेल्या अरबी समुद्र तर एका बाजूला वेढलेल्या डोंगररांगा आपल्याला पाहायला मिळतात.
हे मंदिर सुमारे ८०० वर्षापूर्वीचे आहे. अनेकांचे कुलदैवत असलेले हे शंकराचे जागृत स्थान आहे. आसूद गावातून वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी हे मंदिर असल्याने या मंदिराला चारही बाजूने पाच फूट उंचीची दगडी भिंत आहे. आवारात दीपमाळ आहे. मंडप व गर्भगृह अशी रचना असून मंडपात तीन फूट पाषाण नंदी आहे. मंदिराच्या शेजारी एक विहीर आहे. श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबऱ्यात आढळणारे हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांनी व भाविकांनी या गावाला नक्की भेट द्यावी.
किनाऱ्यापासून एक मैल पाण्यात असलेला व दोन एकर जागा व्यापून राहिलेला हा जलदुर्ग आहे. हर्णे येथील सुवर्णदुर्ग हा पाहण्यासारखा आहे. हा किल्ला छत्रपती शिवरायांनी १६६० मध्ये जिंकला व त्याची फेरबांधणी केली. त्याआधी सोळाव्या शतकात विजापूरकरांनी तो बांधला असावा असे म्हटले जाते. काहीजणांच्या मते हा किल्ला शिलाहार राजवटीपासून असावा. अखंड व भक्कम तटबंदी असणाऱ्या या किलल्याला १५ बुरुज व दोन दरवाजे आहेत. किनाऱ्यावरून होडीने या किल्ल्यात जावे लागते. तटावर मारुती तर पायरीवर कासव कोरलेले आहे. बुरुजलगत काही खोल्या व दोन कोठारे असे बांधकाम आता शिल्लक उरले आहे. आत एक हौद व विहीर आहे. तिथे एका वाड्याचे प्रवेशद्वार व काही अवशेष दिसतात. दुसरा चोर दरवाजा समुद्राच्या बाजूला आहे. तेथे उतरण्यासाठी तटाकडून जिना बांधला आहे. किनाऱ्यावरून होडीने या किल्ल्यात जावे लागते. वाळूच्या छोट्याश्या पुळणीवरून प्रवेशद्वाराकडे जाता येते. अगदी जवळ जाईपर्यंत त्याचा नेमका अंदाज येत नाही.
उन्हवरे हे गाव गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळे मार्गे घाटरस्त्याने आपण थेट उन्हवरे गावात पोहोचतो. हे अंतर दापोलीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे. आपण जेव्हा घाटमाथ्यावरुन खाली खोऱ्यात पाहतो तेव्हा हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारी नदी, वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे डुलणारी शेती हा निसर्गाचा नजारा पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. वर सांगितल्याप्रमाणे उन्हवरे गाव हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. हे गाव नदीकाठी वसलेले आहे. जमिनीखालून बाहेर येणारे हे उकळते पाणी तीन कुंडात साठवले आहे. हे पाणी गंधकयुक्त आहे. त्यामुळे या पाण्यात स्नान केल्यावर त्वचारोग बरे होतात. येथे येणाऱ्या पर्यटकांना स्नान करावयाचे असल्यास येथे स्नानगृहेही बांधलेली आहेत. पाणी स्वच्छ असून त्यातून येणारे बुडबुडे आपण स्पष्टपणे पाहू शकतो. आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य असून समोरच्या डोंगरावर महादेव मंदिर, घनदाट झाडी असे निसर्ग वैभव पाहणे हि वेगळीच अनुभूती असते. महादेवाच्या दर्शनाने मन तृप्त होते, निसर्ग दर्शनाने आनंद मिळतो आणि गरम पाण्यात अंघोळ केल्याने शांती मिळते. असा एकत्रित अनुभव म्हणजे एकावर एक फ्री !
एकीकडे दिवसभर तळपणारा सूर्य साऱ्या पृथ्वीवर गारवा निर्माण करण्यासाठी स्वतःहून समुद्रात लुप्त होत असतो, तर दुसरीकडे त्याच सागरातील दर्याची दौलत घेऊन कोळ्यांचे मचवे किनाऱ्यावर विसावत असतात. या बोटी वाळूत नांगर टाकतात आणि काही मिनिटात हर्णेच्या बंदराच अवघ रूपरंग पालटून जात. दिवसभर सुशेगात असलेल्या या बंदराला संध्याकाळी अया वेळेत अचानक जाग येते. या ठिकाणाला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. सकाळपेक्षा साधारणतः संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत दापोलीजवळच्या या हर्णे बंदरामध्ये हा सुप्रसिद्ध माशांचा लिलाव भरतो. दाभोळप्रमाणे हर्णे हेही एक प्रमुख बंदर आहे. हे बंदर मासे व्यवसायासाठी अधिक ख्यातमान आहे. मच्छिमारीसाठी गेलेले मचवे संध्याकाळी सूर्यास्ताच्या आसपास बंदरात येतात, तेव्हा त्यातील ताज्या माश्यांचा खरेदीसाठी जी झुंबड उडते, ती पाहण्यासारखी असते. एकसाथ सुमारे २०० च्या संख्येने मचवे बंदराला लागतात आणि बंदर गजबजून उठते. मुंबईसारख्या शहरातल्या मासळीबाजारात येणाऱ्या माशांमधला मोठा वाटा इथूनच येतो. या व्यापाराची पहिली पायरी म्हणजे हा लिलाव. समुद्रातून पकडून आणलेले माश्यांचे ढीगच्या ढीग किनाऱ्यावर खोक्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यावर उभे राहून दलात त्यांची बोली लावत असतात. सभोवताली जमलेले घाऊक व्यापारी आपापला भाव चढवत ती बोली जिंकण्यासाठी डावपेच आखतात. २०-३० हजारापासून सुरु होणारी हि बोली कशी लाखाच्या घरात पोहचते तो सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासारखा असतो.
दापोली तालुक्यातील दाभीळ-पांगरी खोरे असून याच खोऱ्यात पन्हाळेकाजी गाव आहे. दापोली-दाभोळ रस्त्यावरील पन्हाळेकाजी लेणी जवळपास १००० वर्षे जुनी मनाली जातात. या लेण्यांमध्ये २९ गुंफा आहेत. संपूर्ण दगडात वसलेली हि लेणी अजंठा येथील लेण्यांशी साधर्म्य दाखवतात. कोटजाई आणि धाकटी या नदीच्या संगमाजवळ हि लेणी असून त्यात बौद्ध व हिंदू अशा दोन्ही पद्धतीची शिल्पे आहेत. तसेच सरस्वती, गणपती यांच्या मूर्ती तसेच महाभारत आणि रामायणातील प्रसंग इथे अतिशय कलात्मकरीत्या कोरलेले आहेत. शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून हि अलीकडेच उजेडात आली आहेत. बौद्ध विहार, वज्रयाल, लीनयाल व नागपंथीय अशा कलाकारांनी वेगवेगळ्या काळात या लेण्या अखंड दगडात खोदल्या आहेत. बुद्ध धर्माच्या अनुयायांनी तिसऱ्या शतकात या लेण्यांचा प्रारंभ केला. अनेक शतके तेथे हे अनुयायी उपासना करीत असत. शैव व गाणपत्य यांनी अकराव्या शतकात तेथे केंद्रे स्थापन केली. तर चौदाव्या शतकात नागपंथीयांनी तेथे गोरखनाथ, मच्छिन्द्रनाथ अशी चौर्यांशी साधकांची शिल्प तयार केली. यापैकी काही लेण्यांचे काम अर्धवट सोडून देण्यात आले असावे. महादेवाच्या पिंडीमुळे गौरवलेणे हे या ठिकाणाचे आकर्षण ठरले आहे. बुध्दविहार, अपुऱ्या अवस्थेतील स्तूप या लेण्यांची आणखी वैशिष्ठये आहेत.
श्री भगवान परशुरामांना सर्व चित्पावनांचा आध्यपुरुष, दैवत मानतात. मग हा आपल्या ज्ञातीचा आधपुरुष कसा आहे? या भावनेतून भगवान परशुरामांविषयी जास्त माहिती मिळवत गेलो, वाचत गेलो आणि लक्षात येऊ लागलं कि चारी वेदांवर प्रभुत्व असलेले, ज्ञानसाधना, तपसाधना करणारे भगवान परशुराम शस्त्र विधेसाठीहि उपासना करणारे आहेत, बलोपासना करणारे आहेत. ज्याचा उपयोग अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी अन्यायींना शासन करण्यासाठी त्यांनी केलेला आहे. ज्या भार्गवरामांची माता रेणुकादेवी क्षत्रिय आहे, ज्यांना दशावतारामधील परशुरामांच्या नंतरचा अवतार दाशरथी राम जो क्षत्रिय आहे त्याला आपला वैष्णवी चाप देऊन आपली शक्ती संक्रमीत केली. अशा भगवान परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली या विधानांत खरंच तथ्य आहे कां? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला तेव्हाच मिळू शकतात जेव्हा त्यांच्याविषयी बायस विचार न करता त्यांचे चरित्र आपण वाचू , अभ्यासू. भगवान परशुराम असे आहेत कि ज्यांना चित्त्पावनांनीच नाहीतर जगातील कोणीही दैवत मानावे. संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावर नि:स्पृहपणे त्याचे केलेले दान आणि कोकणभूमी निर्माण करून त्यांच्या सृजनशीलतेचे झालेले दर्शन अशा पूजनीय, वंदनीय भगवान परशुरामाचे त्याच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य काहीतरी उभे करावे असे गेले ३० वर्षे मनात होते.