मंदिर विशेष

आंजर्ले गाव रत्नगिरी जिल्ह्यात समुद्र काठी उत्तर अक्षांश १७ ͒- ४२’ आणि पूर्व रेखांश ७३ ͒- ८’ वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई – गोरेगांव – आंबेत – मंडणगड – दापोली – आंजर्ले अथवा मंडणगड – पालवणी – कादिवली – वेळवी मार्गे आंजर्ले असे दोन रस्ते आहेत. पुणे, कोल्हापूर, कराड, हि गावे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली – अडखल – आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम मे २००३ मध्ये पूर्ण होऊन आता आंजर्ले गाव सागरी महामार्गाचा एक महत्वाचा टप्पा बनला आहे.मध्ये पूर्ण होऊन आता आंजर्ले गाव सागरी महामार्गाचा एक महत्वाचा टप्पा बनला आहे.

मंदिराचा ज्ञात इतिहास

हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती मंदिर असे नाव पडले असावे. सध्याच्या मंदिराच्या जागेवर एक मंदिर पुरातन काळापासून होते व त्याची पूजाअर्चा व व्यवस्थापन आंजर्ले गावातील नित्सुरे (वेदशाळा घराणे) या घराण्याकडे होती. मंदिराबाबत अशी एक दंतकथा "आख्यायिका ' आहे कि, प्राचीन काळी हे मंदिर समुद्रकिनारी होते, परंतू कालांतराने समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून भरतीच्यावेळी ते जलमय झाले. त्यानंतर श्रीगणेशाने पहिले पाऊल डोंगरमाथ्यावर व दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले. (नारायण घाटी रस्त्यालगत, आजही या पावलाचे दर्शन होते.)

मंदिराचा अर्वाचीन इतिहास

मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक श्री रामकृष्ण (भट) हरि नित्सुरे यांना असा स्वप्नदृष्टांत झाला की " या फार जीर्ण झालेल्या मंदिराच्या जागी अत्यंत त्वरेने नवीन मंदिर बांध." (जीर्णम गृहं सुदृढम अत्र विदेहि शीघ्रम । ) हा दृष्टांत झालयावर श्री रामकृष्णभट यांनी पुणे येथे जाऊन त्यांचे यजमान श्री दादाजी घाणेकर (पेशव्यांचे सावकार व मूळ गाव आंजर्ले) आणि रघुनाथ कृष्ण भट (धारवाड) यांना या दृष्टांताची हकीगत सांगितली. त्यांनी मोठ्या औदार्याने मंदिराचे काम त्वरित सुरु करा असे सांगुन आर्थिक बाजू सांभाळली . हे आश्वासन मिळाल्यावर श्री रामकृष्ण भटांनी मूळ कौलारू मंदिराच्या जागी, आज विद्यमान असलेले जांभ्या दगडाचे पालाशयुक्त मंदिर नव्याने उभारले. हे काम इ.स. १७६८ ते १७८० या कालावधीत काम पूर्ण झाले. (त्या काळचा अंदाजे खर्च रु.५० हजार.)

मंदिराच्या रचनातंत्राची वास्तुशात्रीय माहिती

या पूर्वाभीमुख मंदिराची लांबी ५५ फूट, रुंदी ३९ फूट व उंची ६० फूट आहे. सभागाराला कमानी आहेत व ३५ फूट उंच – आहे. या मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय (वाकवट कालीन), मध्ययुगीन रोमन (बैझंटाईन) आणि अर्वाचीन पाश्च्यात्य (गोथिक) वैशिष्ट्यांचा एकजीव कलात्मक संगम पाहण्यास मिळतो. सभागाराला ८ कमानी आहेत तर गर्भागालांतही ८ कमानी आहेत. कमानी उभारण्याचे तंत्र प्राचीन असले तरी भारतात हि पद्धत १५ व्या शतकात प्रचलित झाली. या पद्धतीत भिंतीचे वजन वरील घुमटासह भिंतीच्या पायावर परावर्तित करतात. गर्भागाराच्या शिखराची बांधणी करताना एका वैशिष्ट्यपूर्ण तंत्राचा वापर केलेला आहे. गर्भागारावरील पहिला घुमट आतल्या बाजूने ३५ फूट उंच आहे. तो बांधण्यापूर्वी चार चौरस भिंतीचे अष्टकोनाकृतीत रूपांतर केले आहे. मात्र हे रूपांतर करताना एक विलक्षण तंत्र वापरले आहे. अष्टकोनाकृतीचे आठ पाय गर्भागाराच्या जमिनीवर टेकलेले असल्याने गर्भागाराची आतली बाजू पूर्णपणे अष्टकोनी आहे आणि गर्भागाराचा चौरस आकार केवळ भासमय आहे. घुमटाच्या शिरोबिंदूवर उमलत्या कमलपुष्प पाकळ्यांचे डिझाइन होते. काळाच्या ओघात या दगडांचे विघटन होऊन हि कमलाकृती कोसळून पडली. अंतरालाच्या पट्टीत उत्तर बाजूनें मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे. पुढील वर्णाचा अनुभव गच्चीवरून अनुभवता येतो. गर्भागाराच्या चार भिंती बाहेरच्या बाजूने पुन्हा वर उचलून गच्चीवर पाच फूट उंचीचा चौरस करून पुन्हा एकदा त्याचे अष्टकोनाकृतीत रचनेत रूपांतर केले आहे. या उचललेल्या भागातच गर्भागारात सूर्यप्रकाश येण्यासाठी द्वार ठेवले आहे. गच्चीवरच्या गर्भावरील या दुसऱ्या अष्टकोनी रचनेच्या आधाराने दुसरा एक सुमारे १०/११ फूट उंचीचा व आतून पोकळ असलेला घुमट उभारलेला आहे. या दुसऱ्या घुमटाचा बाह्यभाग नानाविध आकृतीबंधानी आणि वेलबुट्टीने, तसेच १६ उपकलश आणि अष्टविनायकांच्या प्रतिमा यांनी नटलेला आहे. (कळसावरील या दुसऱ्या घुमटात प्रवेशासाठी असलेले छोटेसे द्वार द्वितीय जीर्णोद्धाराच्या वेळी इ.स. १९९१ मध्ये बंद करून त्याजागी मोरगावच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली.) या दुसऱ्या घुमटाच्या वर कलशाकृती शिखर कमलदलांवर विसावले असून त्याची निमुळती अग्रशिखा (Tapering Point) अवकाशाचा भेद करित आहे. बेझंटाईन पध्दतीचा घुमट उपड्या हंडीच्या आकाराचा (मेणबत्ती लावण्याच्या हंडीसारखा) असतो. या घुमटांचे हिंदूकरण करताना त्यावेळच्या स्थपतींनी विलक्षण चातुर्य प्रकट केले आहे. सर्व घुमटात अंतर्भागात शिरोबिंदूवर कमलपुष्प आहे तर बाह्य भाग कलशाकृती असून त्याच्या बैठकीच्या जागी कमळाच्या पाकळ्यांची वेलबुट्टी आहे. गर्भागारावर एकूण २१ कळस आहेत.

मंदिराला लाभलेले सौंदर्याचे वरदान

मंदिराला लाभलेले सौंदर्याचे वरदानआंजर्ले गावाला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. सागर किनारी आणि खाडी काठची भरती – ओहोटीच्या वेळची जलक्रीडा पाहणे हा संस्मरणीय अनुभव आहे. सदाहरित वृक्षराजीची शाल पांघरून अत्यंत नीरव वातावरणात गाव पहुडलेले असते. पक्षांच्या मंजुळ कुजनाने मूळच्या प्रसन्न वातावरणात आल्हादकारक भर पडते. मंदिराचे पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरूनच भक्तमंडळींना खुणावत असतात. गर्द झाडीत लपलेल्या मंदिराची मानवनिर्मित कलाकृती केवळ अनुपम आहे. पण या सगळ्या चराचराशी एकदां भावनिक तादात्म्य साधले की सकाळ – संध्याकाळच्या बदलत्या रंगानी रंगलेले मंदिर, चांदण्याच्या धूसर प्रकाशात आणि पौर्णिमेच्या सुधारसात स्नान करणारे मंदिर, पावसाळ्यातील सागराचे रौद्र तांडव आणि त्यावेळी धुवाधार पावसात सचैल स्नान करणारे मंदिर असे सौंदर्याचे परोपरीने अविष्कार केवळ रसिक मनालाच जाणवतात. दृक प्रत्ययापलीकडील आनंदभूमीत जाण्याची किमया, ”हें तर देणे ईश्वराचे.”

मंदिराचे एकमेवव्दितीय वैशिष्ट्य

मंदिराचे एकमेवव्दितीय वैशिष्ट्यमंदिरातला सौधतल किंवा गच्ची असून तिथे जाण्यासाठी जिन्याची सोय असलेले हे मंदिर साऱ्या महाराष्ट्रांत एकमेव आहे. जिन्याची रचना सहेतुक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. वरच्या सौधतलाच्या कळसाभोवती प्रदक्षिणा घालताना अनंत आकाशाशी चित्तवृत्ती एकरूप होतात. ” आकाशाची गंभीर शांती । मंदमंद ये अवनीवरती ।। ” या बालकवींच्या कवितेच्या ओळी कोणाही रसिकाला अशा वेळी आठवतात. बाजूच्या बकुलवृक्षांच्या फुलांच्या सौम्य सुगंध आणि पानांची मंद सळसळ यांनी चित्तवृत्ती उल्हसित होतात.

व्दितीय मंदिर जीर्णोद्धार

इ.स. १७८१ मध्यें बांधलेल्या या मंदिराला इ १९९० मध्ये २१० वर्षे पूर्ण होत होती. या २१० वर्षाच्या कालावधीत ऊन – पाऊस – वारा आणि हवेतील क्षाराने मंदिराचे बाह्यलेपन ढिसूळ व सच्छिद्र बनले होते. नित्सुरे व्यवस्थापनाने मंदिर जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन ३० नोव्हेंबर १९९० ते २४ फेब्रुवारी १९९६ (प्रत्यक्ष कामाचे दिवस ४७९) या कालावधीत पूर्ण केले. थोडा तपशील माहितीसाठी आवश्यक आहे. अ) हे दुरुस्ती काम करताना अत्याधुनिक केमिकल्स आणि तंत्राचा वापर केला. कळसाच्या बाह्य भागांवर सुमारे ४०० छिद्रे पडून आंत सिमेंट पाण्यासह केमिकेलास रिचवली. नंतर बाह्यांगाची दुरुस्ती केली. कळसांच्या व बाह्य भागाच्या दुरुस्तीला रु. ४,०१,९८८ इतका खर्च झाला. ब) मंदिराच्या अंतर्भागाची दुरुस्ती उदयपूर (राजस्थान) येथील राजप्रासाद आणि भव्य मंदिराच्या पद्धतीने केल्यानें आतल्या भिंती आणि घुमटांचा भाग जणू संगमरवरी दगडाचा असल्याचा भास होतो. या कामांत फार कौशल्या व प्रदीर्घ अनुभव असावा लागतो. यासाठी उदयपूर परिसरातून कारागीर आणले होते. यांत आरास (संगमरवर दगड भट्टींत बनलेला चुना) आणि जिंकी (संगमरवर दगडाची बारीक रेती) यांचा वापर होतो. या कामी खर्च रु. १,८१,८७१.नंतर लादीकाम व पूरक कामें धरून जीर्णोद्धाराचा एकूण खर्च रु. ८ लक्ष १५ हजार ७९४ इतका झाला.